बीड (वृत्तसंस्था) नाशिकमधील महापालिकेच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ कोविंड रुग्णालयात अशीच घटना घडल्याचं वृत्त आहे. अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर नातेवाईकांनी केलेला आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावला आहे.
ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याने बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. ऑक्सिजन अभावी बीड जिल्ह्यातील परिस्थितीत गंभीर होऊ लागली आहे. परळी पाठोपाठ आता अंबाजोगाई मधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात देखील ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. २ आणि ३ वार्डात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, हा आरोप अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी फेटाळला आहे.
रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी नाही – डॉ. शिवाजी सुक्रे
नाशिकची घटना ताजी असताना अंबाजोगाई येथेसुद्धा रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचे आरोप झाल्यानंंतर पुन्हा मोठी खळबळ उडाली. ऑक्सिजन कमतरता होती तर रुग्णालय प्रशासनाने आधीच खबरदारी का घेतली नाही, असे आरोप होऊ लागले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी याबाबत अधिकचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी सध्या आमच्याकडे रुग्णांसाठी लागणारा आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
अंबाजोगाई मधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात देखील ऑक्सिजनचा पुरवठा घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनची बेड संख्या २२५ असून दररोज ८०० सिलेंडरची मागणी आहे. मात्र, ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने लातूर, बीड या ठिकाणाहून ऑक्सिजन मागवण्यात आले आहेत. परंतु पुरवठा कमी असल्यानं प्रशासन देखील आता हतबल झाले आहे.