जालना (वृत्तसंस्था) सोन्याचे बिस्कीट देण्याचे अमिष दाखवून एका महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांचे दागिने काढून घेत दोन भामट्यांनी महिलेला बनावट सोन्याची बिस्किटे देऊन फसविल्याची घटना दि. २६ रोजी शहरातील फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या परिसरात घडली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानेगाव (ता. बदनापूर) येथील यमुनाबाई पांडुरंग भिसे या शुक्रवार दि. २६ रोजी धारकल्याण येथून नानेगावला जाण्यासाठी जालना बसस्थानकात आल्या होत्या. बसची वाट पाहत असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. आमच्याकडे सोन्याची बिस्किटे असून ती तुम्हाला देतो, असे म्हणत त्यांनी यमुनाबाई यांना फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या परिसरात नेले. त्यानंतर यमुनाबाई यांना सोन्याचे बिस्किट हवे असेल तर एक लाख रुपये देण्यास सांगितले.
यमुनाबाई यांनी माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितल्यावर त्यांच्याकडील दागिने मागितले. यमुनाबाई यांनी गळ्यातील दोन सोनपोत व कानातील फुले संशयितांना दिल्यानंतर त्यांनी दोन सोन्याची बिस्किटे दिली. त्यानंतर यमुनाबाई या सोनाराच्या दुकानात गेल्या असता, सदर बिस्किटे बनावट असल्याचे सोनाराने सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यमुनाबाई यांनी सदर बाजार ठाण्यात येऊन अज्ञात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला.