नशिराबाद (प्रतिनिधी) आपण नशिराबादचा कायापालट करून दाखवू असे दिलेले अभिवचन कायम लक्षात असल्याने मागील काळातील नशिराबादचा विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असून ६७ कोटी निधीच्या पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अमृत योजनेत समावेश केला आहे. लवकरच या योजनेस तांत्रिक मान्यता मिळणार असून मानसी १३० लिटर प्रमाणे पाण्याचा मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याने ६७ कोटीच्या अमृत योजनेने नशिराबादकरांची तहान भागविणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली . ते नशिराबाद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील हे होते.
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, विकास कामे करतांना कोणताही भेद भाव न ठेवता गावाची गरज लक्षात घेऊन विकासासाठी निधी दिला. विरोधकांची कामांच्या माध्यमातून बोलती बंद केली असून नाशिराबाद येथे एक महिन्याच्या आत ६७ कोटींची पाणीपुरवठा योजना तडीस लावणार आहे. राज्यस्तरावरील नगरोत्थान योजने अंतर्गत ६१ कोटी निधीची भूमिगत गटार योजनेचा तसेच २१ कोटीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व २ कोटी ४४ लक्षचा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा DPR तयार आहे. यामुळे शहरातील नदीत सोडले जाणारे दुषित पाणी थांबविण्यास मदत होणार आहे. तसेच भवानी माता मंदिर परिसराच्या पर्यटन अंतर्गत विकास ४ कोटी ९५ लक्ष, झिपरू अण्णा महाराज मंदिर परिसराचा विकासासाठी ४ कोटी ९१ लक्ष अश्या एकूण १४९ कोटींचा निधीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरच मान्यता देणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता सिझनेबल पुढाऱ्यांवर खरपूस टिका केली.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेनेचे माजी सरपंच विकास पाटील, योगेश पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, शहर प्रमुख विकास धनगर, युवासेनेचे चेतन बऱ्हाटे , भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, किरण पाटील, चंद्रकांत भोळे, कैलास नेरकर, असलम सर, शे. करीम मण्यार, करीम कल्ले, नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, दिलीप पोकळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, महिला संपर्क प्रमुख सरिताताई कोल्हे, शोभाताई चौधरी, चंद्रकांत पाटील, नितीन बेंडवाल, मोहन कोलते, एकनाथ नाथ , रवींद्र नाथ, भूषण कोल्हे, माजी सभापती जनाआप्पा कोळी, संतोष रगडे, रविंद्र इंधाटे, नीलकंठ रोटे, शे. सत्तर शे, मजीद, जितू पाटील , यांच्यासह परिसरातील सरपंच व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा न. पा. मार्फत मुख्याधिकारी रवींद्र सोनावणे यांनी, मण्यार बिरादरी व शहा बिरादरी , सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती तसेच शिवसेना- भाजपा युती तर्फे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भव्य नागरी सत्कार केला तेव्हा एकाच जल्लोष करण्यात आला.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक राजेंद्र पाचपांडे सर यांनी केले. प्रास्ताविकातून मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळाल्याने नशिराबादच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. आज पर्यंत केलेल्या व सुरु असलेल्या कामांची सविस्तर माहिती मुख्याधिकारी यांनी विषद केली. शहर प्रमुख विकास धनगर व न.पा.चे लेखापाल संतोष रगडे यांनी आभार प्रदर्शन केले.
भविष्यात नशिराबादकर विकास कामांची उतराई करणार – मान्यवरांचे बोल
माजी सरपंच विकास पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, असलंम सर, जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून ना. गुलाबरावजी पाटील यांनी आजवर नशिराबाद शहराच्या विकासासाठी भरीव निधी प्रदान केला असून ना. गुलाबराव पाटील म्हणजे विकासाची चौफेर जाण असलेले नेते आहेत. ते दिलेल्या शब्दाला जागणारे नेते असून खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहे. भविष्यात निवडणुकीत नशिराबादकर विकास कामांची उतराई करणार असल्याची खात्री सर्वच मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केली. यावेळी शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामावर काम करणाऱ्या कामगारांचा प्रातिनिधिक स्वरुपात माणिक धनगर व सुलतान तडवी या कामगारांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१३ कोटींच्या विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण !
असून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नशिराबादच्या विकासकामांसाठी शहरात आतापर्यंत ३२ कोटींची विकास कामे मंजूर केली असून यातील अनेक कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. तर त्यातील १३ कोटींच्या कामांचे लोकार्पण व भूमिपुजन आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपालिकेच्या अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, पेव्हींग ब्लॉक बसविणे, कॉंक्रीट गटर बांधकाम, अशा महत्वाच्या विविध कामांचे यात नगरपरिषद नवीन इमारत बांधकाम – ४ कोटी, दलितेत्तर योजने अंतर्गत ५४ लक्ष ८६ हजार निधीतून विकास कामे, नगरोत्थान योजनेअंतर्गत २ कोटी ३९ लक्ष, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत ९५लक्ष , स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत संकलित कचऱ्यावर प्रक्रिया ४४ लक्ष अशा ५ कोटी रुपये निधीतून विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले तर दलितेत्तर योजने अंतर्गत ९६ लाखांची कामे पूर्णत्वाकडे आली असून नगरोत्थान योजने अंतर्गत १ कोटी २८ लक्ष, नवीन नगरपरिषद योजने अंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरण – १ कोटी, अल्पसंख्यांक निधी अंतर्गत कब्रस्तानास संरक्षण भिंत बांधकाम – २५ लक्ष , दलितेत्तर योजना अंतर्गत मंजूर झालेल्या ३ कोटी पैकी २ कोटी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांचे ठिकठिकाणी अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. बस स्थानक परिसरात मुख्य कार्यक्रम पार पडला.