हैदराबाद वृत्तसंस्था : तेलंगणातील ‘डिजिटल अरेस्ट’ च्या एका प्रकरणात भामट्यांनी ८१ वर्षीय वृद्ध व्यक्तीची तब्बल ७ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. त्याच्याकडून पैशाची मागणी सुरूच राहिल्याने पीडित व्यक्तीने ३० डिसेंबरला तेलंगणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गतवर्षी २७ ऑक्टोबर रोजी कुरिअर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून पीडित व्यक्तीला फोन केला. मुंबईहून थायलंडला पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ, पासपोर्ट, काही डेबिट व क्रेडिट कार्ड असून ते मुंबई पोलिसांना सुपुर्द करण्यात आल्याचे या कथित प्रतिनिधीने सांगितले. यानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या एका भामट्याचा पीडित व्यक्तीला फोन आला. पीडित व्यक्तीवर तो एका मोठ्या अमली पदार्थ तस्करी, मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर बँक खात्यातील व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. पीडित व्यक्तीने दोन महिन्यांत तब्बल ७ कोटी १२ लाख रुपये या भामट्याच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्याच्याकडून पैशाची मागणी सुरूच राहिल्याने पीडित व्यक्तीने ३० डिसेंबरला तेलंगणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
















