जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १८ नगरपालिकांच्या निकालात भाजपा व शिवसेना शिंदे गटाचा दबदबा राहीला. यात रावेर लोकसभा क्षेत्रात भाजपाचा वरचष्मा राहीला आहे. तर जळगाव लोकसभा क्षेत्रात शिंदे गट फार्मात असल्याचे निकालावरून दिसुन येत आहे. जिल्हाभरात भाजपा व शिंदे गटाला यश मिळाले असले तरी स्ट्राईक रेट बाबतीत शिंदे सेना भाजपापेक्षा सरस ठरली आहे.
रावेर लोकसभा क्षेत्रातील १० नगरपालिकांपैकी ५ नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. तर शिंदे गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. या क्षेत्रात उबाठाला एकाच नगरपालिकेत यश आले आहे. भाजपाचे बंडखोर सुनिल काळेंनी वरणगावात प्रस्तापित पक्षांना धुळ चारत धक्कातंत्र दिले आहे. एकंदरीत भाजपाला जामनेर, शेंदुर्णी, सावदा, फै जपुर व रावेर नगरपालिकेत सत्ता मिळवण्यात यश आले असले तरी चोपडा, मुक्ताईनगर, यावल येथे पराभवाची चव चाखावी लागली आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात देखील शिंदे गटाने यश मिळवले आहे. दुसरीकडे जळगाव लोकसभा क्षेत्रात अपेक्षे प्रमाणे शिंदे गटाने स्ट्राईक रेट राखला असला तरी धरणगाव नगरपालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटलांसाठी हा जोरदार धक्का आहे. मात्र शिंदे गटाने अपेक्षे प्रमाणे पारोळा, भडगाव, पाचोरा, अमळनेर नगरपालिकेवर भगवा फडकवला आहे. या क्षेत्रात भाजपाला मात्र चाळीसगाव एरंडोल, नशिराबाद येथे यश मिळाले आहे. विषेश म्हणजे चाळीसगाव वगळता अन्य दोन्ही नगरपालिकेत भाजपा शिंदे गटाशी युती करून लढली होती.
मंत्री महाजनांनी गड राखले
जामनेर मतदार संघातील जामनेर व शेंदुर्णी नगरपालिकांवर भाजपाने निर्वीवाद सत्ता मिळवली आहे. दोन्ही ठिकाणी विजयाची परंपरा भाजपाने कायम राखली आहे. त्यामुळे मंत्री महाजनांनी आपले गड राखण्यात यश मिळवले आहे. जामनेरात राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील चांगली लढत दिली असुन चार जागा मिळवल्या आहे.
कॉंग्रेसची अस्तित्वाची लढाई कायम
रावेर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसने काही जागांवर यश मिळवले आहे. सर्वाधिक ६ जागा यावल येथे तर फैजपुरात ५ जागा भुसावळ येथे ३, शेंदुर्णी येथे २ रावेर मध्ये २ जागा आल्या आहे. एमआयएमने देखील फै जपुर नशिराबाद येथे खाते उघडले. जळगाव लोकसभा क्षेत्रात मात्र काँग्रेस व एमआयएमला खाते उघडता आले नाही.















