जळगाव (प्रतिनिधी) : वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने तुम्हाला अटक करण्यात येईल. अशी धमकी देऊन सायबर गुन्हेगारांनी संरक्षण खात्यातील सेवानिवृत्त अभियंत्याकडून १८ लाख २१ हजार उकळून त्यांना गंडविले. ही घटना दि. १७ ते दि. २७फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील मनोहर वसंत चौधरी (वय ७१) हे केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या पुणे कार्यालयातून सहायक अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले असून ते सध्या शेती करतात. त्यांना दि. १७ फेब्रुवारी रोजी अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. आपल्या नावे असलेल्या आधारकार्डद्वारे एक सिमकार्ड सुरू असून त्याद्वारे मेसेज व्हायरल होत असल्याने क्राईम ब्रँच येथे गुन्हा दाखल झाला असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा पोलिसांच्या गणवेषात असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. त्या व्यक्तीने नाशिक येथे कॅनरा बँकेत तुमच्या नावाच्या आधारकार्डद्वारे खाते उघडले असून त्यामध्ये अपहाराचे मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातून अटक वारंट निघाले असल्याचे सांगितले.
पोलिसांच्या गणवेशातील ठगाने अटकेची धमकी
दि. १८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्ताशी पुन्हा पोलिस गणवेशात असलेल्या एका जणाने संपर्क केला. अटक वारंट निघाल्याने तुम्हाला दोन वाजेपर्यंत अटक करायचे असल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्याशी संबंधित काही कागदपत्रेही व्हाटसअॅपवर पाठविले. आम्हाला न विचारता कोठेही जायचे नाही व प्रत्येक दोन तासाला ‘आम्ही सुरक्षित आहे’ असा मेजेस पाठवा अशा सूचना दिल्या.
वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर
दि. २० फेब्रुवारी रोजी कॉल करून समोरील व्यक्तीने केसमधून बाहेर पडण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानुसार मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील बँक खात्यात ३ लाख १० हजार २८३ रुपये, उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथील बँक खात्यात २ लाख १ हजार२८३ रुपये समोरील व्यक्तीने पाठविण्यास सांगितले. २४ फेब्रुवारी रोजी पुन्हा कॉल केला व तुमच्याकडे असलेले सोने तारण ठेवून पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार चौधरी यांनी १३ लाख १० हजार २६० रुपये बिहारमधील बेनीपूर शाखेतील बँक खात्यात पाठविले होते.
बँकेसह केंद्रातील अधिकारी सहभागी
समोरील व्यक्तीने धमकावल्याने चौधरी यांनी विविध बँक खात्यांची माहिती व त्यात किती पैसे आहे तसेच स्वतःचे घर, आठ एकर शेती असल्याबाबत माहिती दिली. यामध्ये बँकेचे काही अधिकारी, पोलिस अधिकारी व इतर अधिकारी सामील असल्याने भारत सरकारने माहिती गुप्त ठेवण्यास सांगितले असल्याचेही सेवानिवृत्तास सांगितले















