जळगाव प्रतिनिधी : कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्या अमोल गंगाधरराव भेंडे (वय ३८, रा. गुरुदत्तनगर) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरटे घरात शिरले. त्यांनी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली ५० हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना दि. २६ मार्च ते दि. ३० मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गुरुदत्त नगरातील यश हाईट्स समोर अमोल भेंडे हे वास्तव्यास असून ते पुणे येथील खासगी कंपनीत नोकरीस आहे. दि. २६ मार्च रोजी ते नोकरीनिमित्त पत्नी, मुलगा व सासू सासऱ्यांसह मुंबई येथे गेले होते. दि. ३० मार्च रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मुंबईहून घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जावून बघितले असता, त्यांना लाकडाची अलमारी उघडलेली होती. परंतू त्यातील वस्तू व्यवस्थीतच होत्या.
लोखंडी कपाटातून चोरुन नेली रोकड
चोरट्यांनी बेडरुमधील लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडून लॉकरमध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. भेंडे यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी लागलीच सकाळी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














