चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील एक मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी जळगाव, धुळे किंवा छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता. सद्यस्थितीत असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात येऊन तेथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र याबाबत संयुक्तिक असा प्रस्तावच राज्य शासनाकडे दिला न गेल्याने गेली अनेक वर्षे या मागणीला मूर्त स्वरूप आले नाही. मात्र राज्यात महायुती सरकार आल्यानंतर नामदार गिरिषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना गती दिली. विविध विकासकामे व प्रकल्प यांच्या प्रलंबित फाईली युद्धपातळीवर शासनाकडून मंजूर होऊ लागल्या. दि.७ मार्च रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांच्याहस्ते झाले होते. राज्यात तब्बल १३ वर्षांनंतर मंजूर झालेलं हे पहिले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असल्याने त्याची राज्यात चर्चा झाली होती. या उद्घाटन समारंभातच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन व चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालय मंजुरीचे संकेत दिले होते. आणि त्यांनतर अवघ्या ५ दिवसातच दि.१२ मार्च रोजी चाळीसगाव येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने चाळीसगाव वासीयांना महायुती सत्कार कडून डबल गिफ्ट मिळाले आहे.
याबाबत आमदार मंगेशदादा चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्यातील लोकसंख्या व भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका असूनही तेथे आवश्यक त्या प्रशासकीय व आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. छोट्या छोट्या कारणांसाठी आपल्याला १०० किमी जळगाव येथे जाण्याशिवाय पर्याय राहत नव्हता. त्यामुळे चाळीसगावकरांच्या वेळ, श्रम, पैश्यांचा एकप्रकारे अपव्ययच होत होता. त्यामुळे राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून तसेच ग्रामविकास मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक प्रमुख प्रशासकीय कार्यालये, इमारती चाळीसगाव येथे मंजूर केल्या आहेत. त्यात आता १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मोठी भर पडली आहे. यामुळे गोर गरीब रुग्णांना चाळीसगाव येथेच उपचार मिळतील. केवळ मंजुरी मिळून मी थांबणार नसून उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन अत्याधुनिक इमारत बांधकामासाठी बिलाखेड शिवारात शासकीय जागेची देखील मागणी केली आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त उपजिल्हा रुग्णालय चाळीसगाव वासीयांच्या सेवेत दाखल होईल. सदर उपजिल्हा रुग्णालय मंजुरी दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, आरोग्य सेवा संचालनालय संचालक, सहसंचालक, उपसंचालक यांचे मनापासून आभार मानतो असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
थेट ३० खाटांवरून १०० खाटांचे विशेष बाब म्हणून मंजूर झालेलं राज्यातील दुर्मिळ उदाहरण…
राज्यात उपजिल्हा रुग्णालय मंजुरी साठी काही निकष व अटी राज्य शासनाने घातल्या आहेत. त्यात इतर जिल्हा व उपजिल्हा रुग्णालय यातील अंतर, रुग्णसंख्या आदी बाबी विचारात घेतल्या जातात त्यानंतर आधी ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले जाते. चाळीसगाव ते जळगाव अंतर, जिल्ह्यातील मोठा तालुका असल्याने तसेच प्रसूती मध्ये देखील तालुक्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक असल्याने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरून ५० खाटा ऐवजी थेट १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन करण्याची मागणी केली होती. केवळ मागणी करूनच ते थांबले नाहीत तर त्याबाबतचा आवश्यक तो प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे पाठवला. त्यात वेळोवेळी आलेल्या त्रुटी दूर केल्या. तसेच ५० ऐवजी १०० खाटाच कश्या योग्य आहेत हे शासनाला पटवून दिले. त्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटावरून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अश्या प्रकारे श्रेणीवर्धन झालेले उपजिल्हा रुग्णालयाचे हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कौशल्य वापरून ही मंजुरी मिळवली आहे.
अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त नवीन इमारत, आवश्यक तो तज्ञ डॉक्टरांचा स्टाफ आता चाळीसगावातच
चाळीसगाव येथे उपजिल्हा रुग्णालय नसल्याने तालुक्यातील रुग्णांना जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जावं लागत होतं. यामुळे रुग्णांच्या वेळेचा अपव्यय होत होता. आता लवकरच चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयामुळे अनेक उपचारांसाठी तज्ञ डॉक्टरांचा स्टाफ तसेच अत्याधुनिक सोयी सुविधा ह्या चाळीसगाव येथे शासनाकडून पुरविण्यात येणार असल्याने चाळीसगाव तालुकवासीयांची जळगाव धुळे वारी आता टळणार आहे