छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) लग्नाच्या रिसेप्शनसाठी मुंबईहून आलेल्या पाहुण्याची १० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग लांबविल्याची घटना ३ डिसेंबर रोजी रात्री औरंगाबाद जिमखाना क्लब येथे घडली आहे.
३ डिसेंबर रोजी औरंगाबाद जिमखाना क्लब येथे एका नातेवाईकाच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी त्यांचे मेहुणे हेमंतकुमार जैस्वाल व त्यांची पत्नी आशा जैस्वाल हे दोघे आले होते. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये अडीच लाख रुपये किमतीचा ५ तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, १ लाख रुपये किमतीच्या २ तोळे वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या, दीड लाख रुपये किमतीचे ३ तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजारांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि ५ हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली होती. कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्यांची बॅग शेजारच्या खुर्चीवर ठेवली होती. ही बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. यासंदर्भात सुनील श्रीरामलाल जैस्वाल (५३, रा. चिकलठाणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.