जळगाव (प्रतिनिधी) कंपनीतून पेमेंट घेतल्यानंतर रस्त्याच्याकडेला फोनवर बोलण्यसाठी उभ्या असलेल्या कुरीयर बॉयच्या डोळ्यात दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी स्प्रे मारला. त्यानंतर कुरीयर बॉयच्या दुचाकीला अडकवलेली ८ ते १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेवून चोरटे पसार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील बीएचआरच्या कार्यालयाजवळ घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
जूने बस स्थानक परिसरातून एक कुरीयर बॉय एमआयडीसीतील एका तेलाच्या कंपनीत पेमेंट घेण्यासाठी आला होता. त्याने सायंकाळी कंपनीतून आठ ते दहा लाख रुपयांचे पेमेंट घेतल्यानंतर तो पुन्हा जूने बस स्थानक परिसरात दुचाकीने जाण्यासाठी निघाला. बराच वेळ झाला तरी कुरीयर बॉय पेमेंट घेवून परतला नाही, म्हणून त्याच्या मालकाने त्याला फोन लावला. मालकाचा फोन आला म्हणून तो कुरीयर बॉय फोन घेण्यासाठी बीएचआरच्या मुख्य कार्यालयाजवळ रस्त्याच्याकडेला थांबला. यावेळी दबा धरुन बसलेले दोघ दुचाकीस्वार चोरटे त्या कुरीयर बॉयजवळ आले.
डोळ्यात मिरची स्प्रे मारुन बॅग घेवन चोरटे पसार
रस्त्याच्याकडेला फोनवर बोलणाऱ्याजवळ दोघ दुचाकीस्वार चोरटे आले. त्यांनी कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला आणि त्याच्या दुचाकीला अडकवलेली रोकड असलेली पिशवी घेवून ते चोरटे तेथून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने पसार झाले.
पोलिसांनी जाणून घेतली घटनेची माहिती
कुरीयर बॉयने घटनेची माहिती मालकाला दिली. मालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.
चौकशीनंतर संशयितांचा शोध सुरु
स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडून त्या कुरीयर बॉयची चौकशी केली जात होती. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेची तपासणी करुन पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. तसेच याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
















