जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) राजौरीतील लष्कराच्या छावणीत दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राजौरीतील दरहल भागातील परगलमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीच्या घुसण्याचा प्रयत्न केला. यावर सतर्क जवानांनी संशयितांना पाहताच गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी गोळीबारही केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. तर तीन जवान शहीद झाले आहेत. सध्या शोधमोहीम सुरू आहे. एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, दारहाल पोलिस स्टेशनपासून 6 किमी दूर असलेल्या इतर तुकड्यांनाही छावणीकडे पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनापूर्वी देशाला हादरवण्यासाठी दहशतवादी संघटना सतत एखादी मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत आणि भारतीय सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना ठामपणे हाणून पाडत आहेत.