जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जळगाव जिल्ह्यातील एक मोठे नेते व महिला नेत्या लवकरच भाजपात दाखल होणार असल्याचा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बॅकेचे चेअरमन संजय पवार यांनी केला आहे.
भाजपात ‘इनकमींग’ वाढत असतांना आता जिल्हयात देखील शरद पवार गटाला जळगाव जिल्हयात खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटातील काही नेते भाजपात व अजित पवार गटात येण्यास उत्सुक आहे. लवकरच राज्यातील शरद पवार गटाचा जळगाव जिल्हयातील बडा नेता व महिला नेत्या भाजपात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केला आहे.
लवकरच हे नेते भाजपात दाखल होतील आणि त्यानंतर जिल्ह्यासह राजकारण ढवळून निघेल, असेही संजय पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रवेशामुळे जिल्हयात महाविकास आघाडीला धक्कातंत्र दिले जाणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, एकीकडे एकनाथराव खडसे यांच्या भाजप घरवापसीच्या चर्चा सुरु आहेत. अगदी खासदार रक्षाताई खडसे यांनी नाथाभाऊ भाजपात आल्यास आनंदच होईल, असे वक्तव्य केले होते. तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह बहाल केले. यापार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाकडुन रायगडवर तुतारी चिन्हाचे शनिवारी अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला बड्या महिला नेत्याची गैरहजेर असल्याची चर्चा आहे. एकदंरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय पवार यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.