नंदुरबार (वृत्तसंस्था) शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती 50 हजारांची लाच स्वीकारताना नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी (52, प्लॉट नंबर 52, शांतीनगर, वाघेश्वरी मंदिराजवळ, नंदुरबार (अरविंद देसले यांच्या घरात) मूळ रा.प्लॉट नंबर 8, गट नंबर 35, मुक्ताईनगर) यांना नाशिक एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. वर्ग एकच्या गलेलठ्ठ पगार घेणारा अधिकारीच लाचेच्या सापळ्यात सापडल्याने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
35 वर्षीय तक्रारदार यांना नवापूर शहरातील नगरपालिका, मालमत्ता क्र. 826, सीटी सर्वे क्र. 624, पंचरत्न शॉपिंग, काँप्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू करावयची होती. या परिसरात 75 मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने एफएलएल- 3 परवाना देण्यास हरकत घेतली परंतु शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अशरफभाई माजीदभाई लखानी अल्पसंख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था, नवापूर या संस्थेच्या अंतर्गत येणार्या गुजराथी माध्यमिक विद्यालय, नवापूर शाळेची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून 50 हजारांची लाच 15 मे रोजी मागण्यात आली व तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात 50 हजारांची लाच घेताना सतीश चौधरी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक (रीडर) नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.