चोपडा (प्रतिनिधी) जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे शहरातील गोवर्धन चौधरी यांचा व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी आरोपी वैभव उर्फ टकल्या गवळी (Tadipar Taklya Gawli) याने रस्ता अडवून दहा हजार खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्याचा राग आल्याने गवळी याने गोवर्धन चौधरी याला जबर मारहाण करत जखमी केल्याची घटना शहरातील महावीर नगर जवळील साईबाबा मंदिराजवळ घडली. (A Businessman Was Beaten Up For Extortion)
गोवर्धन चैत्राम चौधरी (३७, रा लहान भोई वाडा, चोपडा) हा पंकज स्टॉपकडे जात असतांना तडीपार असलेला वैभव उर्फ टकल्या गवळी (रा बारीवाडा, चोपडा) याने महावीर नगर जवळील साईबाबा मंदिराजवळ चौधरी याचा रस्ता आडवून ते करत असलेला जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी दहा हजारांची मागणी केली.
चौधरी यांनी दहा हजार देण्यास नकार दिल्याने गवळीने लाकडी दांड्याच्या साहाय्याने चौधरी यांना मारहाण करत डाव्या हातपायाला दुखापत केली. एवढेच नव्हे तर, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण माधव बारी व गोवर्धन चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. टकल्या गवळी याला १५ नोव्हेंबर पासून तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले असतांना त्याने आदेशाचे उल्लंघन केले आहे. याबाबत गोवर्धन चौधरी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसांत (Chopada City Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहेत.