धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव-जळगाव रोडवरील श्रीजी जिनिंग समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेमुळे एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ७ डिसेंबर रोजी सकाळी घडली होती. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान, अमोल बलदेवसिंग पाटील (वय ३२, रा.जवखेडा ता. एरंडोल) हे त्याच्या मोठा भाऊ देवसिंग यास भेटण्यासाठी श्री. जिनिंग येथे गेले होते. तेथे जितु पोहा सेंटरवर चहा घेतल्यानंतर अमोल पाटील हे त्यांच्याकडील मोटार सायकल क्र. (MH-१९ DS- ३१४८) ने धरणगाव कडेस जाण्यासाठी निघाले. याचवेळी पांढ-या रंगाची इको कार (क्र. MH १० CZ-८७४१) ने भरधाव वेगाने येत मोटार सायकलला पाठिमागून धडक दिली. या अपघातात अमोल पाटील मोटार सायकलसह फेकले गेले. तसेच यात त्यांचा उजवा हात व उजव्या पायास जबर दुखापती झाली. विशेष म्हणजे कार चालक अपघाताची खबर न देता निघून गेला. या प्रकरणी कारमधील चालका (नाव-गाव माहित नाही),विरुद्ध दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना चंदुलाल सोनवणे हे करीत आहेत.
















