जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वडनगरी येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक लढविल्याच्या वादातून उमेदवाराचा भाऊ दीपक गुलाब गायकवाड (वय २२, रा. वडनगरी, ता. जळगाव) या तरुणाला विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार १५ फेब्रुवारी २०२१ रोजी घडला होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात २६ जुलै रोजी दुपारी 4 वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडनगरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावातील गोरख गुलाब गायकवाड यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी केली होती. त्यावरून गावातील शशिकांत प्रल्हाद सोनवणे, मृणाल भुवन पाटील, अनिल प्रल्हाद सोनवणे, कल्याण उत्तम पाटील, भुवन प्रभाकर पाटील यांनी गोरख गायकवाड यांचे भाऊ दीपक गायकवाड यांना जिवे ठार मारण्याचा कट रचून वडनगरी ते खेडी जाणाऱ्या रस्त्यावरील खळ्यात बोलविले. तेथे त्याला जातीवाचक शिवीगाळ करीत तुला गाव सोडायला सांगितले होते, तू गाव सोडत नाही, असे म्हणून मारहाण केली. त्यानंतर त्याचे हातपाय धरून तरुणाच्या तोंडात बाटली कोंबून त्याला काही तरी विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी दीपक गायकवाड या तरुणाने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शुक्रवार २६ जुलै रोजी दुपारी 4 वाजता तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप करीत आहेत.