धुळे (प्रतिनिधी) धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधात महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा झाला आहे. या गंभीर प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली असून या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधात महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा देवपूर पोलिसात दाखल करण्यात आला असल्याची माहिती धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी रविवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत दिली. अधीक्षक बारकुंड म्हणाले की, निरीक्षक पाटील यांनी महिलेला धमकावून अश्लील प्रकारचा व्हिडिओ तयार केला व नतर हा व्हिडिओ सोशल मिडीयातून व्हायरल झाल्याने गंभीर प्रकारचा गुन्हा पोलिस दलातील अधिकार्याने केल्याने त्यांच्या शोधार्थ धुळे स्थानिक गुन्हे शाखेसह धुळे शहर पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
सन 2022 ते 11 नोव्हेंबर 2023 दरम्यान निरीक्षक हेमंत पाटील यांनी पीडीतेकडे शारीरीक सुखाची मागणी केली. तसेच अश्लील वक्तव्य करीत महिलेला कपडे काढण्यास भाग पाडून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली व अश्लील व्हिडिओ व्हायरल केला. तसेच याबाबत वाच्यता केल्यास तुझे मरण जवळ आले आहे, अशी धमकी निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या साथीदारांनी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड म्हणाले की,कुणीही महिला वा मुलीवर भीती दाखवून अन्याय-अत्याचार केला असल्यास पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, दोषींची हयगय केली जाणार नाही, असेही बारकुंड म्हणाले.