जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतंर्गत जळगाव येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात ज्ञानेश्वर विठ्ठल आमले (रा. खडके, ता. भुसावळ) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 50 लाखाचा धनादेश वितरित करण्यात आला आहे.
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव व जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयाकडून रोजगार व स्वयंरोजगारासाठी राबविण्यात येणा-या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेमध्ये लाभ घेतलेले ज्ञानेश्वर विठ्ठल आमले (रा. खडके, ता. भुसावळ) यांना फलॉय ॲश ब्रिक्स या उत्पादनासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भुसावळ या शाखेने ५० लाख रुपये एवढे कर्ज मंजुर केले. तसेच त्यांना १७.५० लाख रुपये एवढे अनुदान शासनाकडुन मिळणार आहे. आमले यांना ५० लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
जिल्ह्यातील युवक व युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेमध्ये रोजगार व स्वंयरोजगारासाठी cmegp.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा, तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी ग्रामोद्योग, शासकीय आयटीआयजवळ, जळगांव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, श्री. चेतन पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.