भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कजगाव येथे उष्माघाताचा दुसरा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विराट गोपीचंद मालचे ह्या आठ वर्षीय बालकाचा मंगळवारी उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विराट हा दिनांक १५ रोजी संध्याकाळी पर्यंत खेळत होता मात्र संध्याकाळी अचानक त्याला उलट्या होत अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे दि. १६ रोजी त्याला चाळीसगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतू धुळे येथे घेऊन जात असतांनाच विराटचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या आठ वर्षाच्या बाळाचा अश्या पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कजगाव गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. हस्त्याखेळत्या मुलाचा असा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाने व नातेवाईकांनी मन हेलावून सोडणारा आक्रोश केला होता.
धक्कादायक म्हणजे मागील चार दिवसांपूर्वी अक्षय सोनार ह्या एकोणतीस वर्षीय तरुणाचा मृत्यूही उष्माघातानेच झाला होता. मयत विराटच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. दिवसेंदिवस तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उन्हाचा पारा ४५ अंशापर्यंत जाऊन पोहचला आहे. त्यामुळे उष्मघाताचे प्रमाणही वाढले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने आज प्रसिद्ध केले आहे.