जळगाव (प्रतिनिधी) आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात पाय घसरून एका १२ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. वैभव नरेंद्र पाटील (वय १२), असे मयत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात वैभव पाटील हा कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी दुपारी ३ वाजता घरातून निघाला होता. सायंकाळी उशीरापर्यंत तो घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी गावात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावासह व शेत शिवारात शोध घेतल्यावर देखील वैभव मिळून न आल्याने नातेवाईकांनी रात्रीच तालुका पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच वैभवचे कुटुंबिय त्याचा शोध घेत होते.
गावातील काही जणांनी वैभवला दुपारच्या वेळेस गिरणा काठावरील महादेव मंदिरात खेळताना पाहिले होते. त्यामुळे बुधवारी दुपारी १२ वाजता वैभवचे काका धीरज पाटील व स्वप्नील जोशी यांच्यासह काही जण नदी पात्रात शोध घेत होते. यावेळी त्यांना नदीपात्राच्या पाण्यावर वैभवचा मृतदेह तरंतांना दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. आपल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दिसताच त्याच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला होता.