भुसावळ (प्रतिनिधी) नागपूर येथील कापड व्यापार्याला शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी कट मारल्याचे निमित्त करीत बेदम मारहाण केली व व्यापार्याकडील 34 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवार, 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजता घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर गुन्हे शोख पथकाने शहरातील तिघांना अटक केली आहे. हर्षल संजयकुमार सावकारे (27, पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ), आनंद प्रकाश पवार (20, नागसेन कॉलनी, कंडारी, ता.भुसावळ) व अनिकेत सदानंद सोनवणे (23, सराफ बाजार, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार किशोर रामेश्वर सदावर्ते (31, न्यू डायमंड नगर, प्लॉट नंबर 12, नागपूर) हे कापड व्यापारी असून ते मित्रासह कारने सुरत येथे कपडे खरेदीसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात कारने दोघे नागपूरकडे निघाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल तनारीकासमोरील उड्डाण पुलावर व्यापार्यांच्या चारचाकीला त्रिकूटाने मोपेडद्वारे कट मारला व वाहन अडवत दोघांना मारहाण करीत केली तसेच व्यापार्याच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची व 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व चार हजार रुपये किंमतीचे व दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व पाचशे रुपये किंमतीची कापडी बॅग (ज्यात एटीएम, आधारकार्ड, लायसन्स होते) संशयितांनी हिसकावून पोबारा केला होता.
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, गुन्हे शोध पथकातील हवालदार निलेश चौधरी, हवालदार रमण सुरळकर, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार तेजस पारीस्कर, अंमलदार प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी, जावेद शहा आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपास सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सुदर्शन लाड हे करीत आहेत.