बारामती (वृत्तसंस्था) चुलत भावानेच आपल्या भावाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना बारामती तालुक्यातील सांगवी येथे आज सकाळी घडली आहे. विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
विनोद फडतरे हा युवक आज दि. १२ (बुधवार) रोजी सकाळी आपली दुचाकी क्र (एम.एच. ४२ एक्स ६२९५) वरुन जुना सांगवी पणदरे रस्त्यावरील शेतात गेला होता. त्या ठिकाणी चुलत भाऊ विशाल फडतरे याने जमिनीच्या वादातून विनोद याची दुचाकी अडवली. त्यानंतर विनोदच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला. विनोदचा मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. गावकऱ्यांनी घटनेबाबत तात्काळ माळेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचतात मृतदेहाचा पंचनामा करून तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आणि मयत विनोद याचा चुलत भाऊ विशाल फडतरे याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता विशालनेच जमिनीच्या वादातून आपल्या भावाचा खून केल्याचे समोर आहे. माळेगाव पोलिसांनी संशयित आरोपी विशालला अटक केली आहे. दरम्यान, चुलत भावानेच आपल्या भावाचा खून केल्याची घटना समोर आल्यानंतर समाजमन सुन्न झाले आहे.