मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या एक दिवस आधीच सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहे. पीएमसी बँकप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यासाठी ५ जानेवारी रोजी त्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार होत्या. मात्र, एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर राहिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना PMC बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.
PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडीकडे गेलं. वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपये देण्यात आले होते. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.
विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले ५५ लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे.