मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं काही शहरांमध्ये निर्बंध लादले जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात काही ठिकाणी नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात लसीकरण वेगाने वाढवलं जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावं लागेल. जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की, लसीकरण करुन घ्या. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्क वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं.
राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही दिवसांपूर्वी १० हजारच्या आत असलेल्या रुग्णसंख्येनं बुधवारी थेट १३ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळं चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘लसीकरणाचा वेग वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे, पण कदाचित काही दिवसांत काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. एक दोन दिवसांत आम्ही याबाबत निर्णय घेणार आहोत. जिथं करोनाचा प्रादूर्भाव अधिक आहे, तिथं लॉकडाऊनचे पाऊल उचलावेच लागेल, असं ते म्हणाले.
नागपूर शहरात लॉकडाऊन
नागपूर शहरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे.