छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) घरगुती वादातून पत्नी कंपनीतून घरी येत असताना पतीने रस्त्यात अडवून तिच्यावर अॅसिड फेकले. मात्र हा प्रकार पाहून रस्त्याने येत असलेल्या एका १८ वर्षीय कामगाराने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारा तरुणही या अॅसिड हल्ल्यात भाजला गेला आहे. ही घटना शनिवारी (दि. २१) सायंकाळी वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली. प्रेम आप्पासाहेब साबळे (१८ रा.जोगेश्वरी) असे या घटनेत जखमी झालेल्या कामगार तरुणाचे नाव आहे.
सुनीता रमेश निळ (रा. बैरवाडी ता. नेवासा हमु जोगेश्वरी) ही महिला पती व दोन मुलांसह जोगेश्वरी येथे राहते. ती परिसरातीलच एका कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तर महिलेचा पती रमेश निळ हा काहीच कामधंदा करीत नाही. काही दिवसांपूर्वी तो पत्नीसोबत भांडण करून त्यांच्या मूळ गावी निघून गेला होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळी कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर सुनीता त्यांची बहीण अंजली खंडागळे व इतर कामगार घराकडे येत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला मद्यधुंद रमेश नीळ हा उभा होता. त्याने पत्नी सुनीता जवळ येताच जवळी कॅनमधील अॅसिड सुनीताच्या अंगावर फेकले. मात्र त्या बाजुला झाल्या. दरम्यान, हा प्रकार पाहून पाठीमागून येणाऱ्या प्रेम साबळे या कामगाराने नीळला समजावण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रेमच्या चेहऱ्यावरही अॅसिड फेकल्याने तो जखमी झाला. सुनीता किरकोळ भाजल्या. प्रेमच्या तोंडावर रमेशने अॅसिड फेकल्याने त्याचा चेहरा भाजला आहे. सध्या त्याच्यावर घाटीत उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी रमेश गोपीनाथ निळ (५५) यास बहिरवाडी जुने गाव (ता. नेवासा) येथून त्याच्या बहिणीच्या घरून ताब्यात घेत अटक केली आहे.