पुणे (वृत्तसंस्था) लष्कर परिसरातील प्रसिद्ध ‘फॅशन स्ट्रीट’ला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत शेकडो दुकानं जळून खाक झाली आहेत. सुदैवाने जिवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. पण लाखो रुपयांचे नुकसान मात्र झाले आहे. रात्री ११ वाजता लागलेली आग १६ फायर बंबच्या मदतीने दिड वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात आली. आगीत सुमारे ४०० दुकाने जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लष्कर परिसरात एमजी रस्त्यावर हे ‘फॅशन स्ट्रीट’ आहे. येथे छोटछोटे दुकान आहेत. मध्यवस्ती सारखी अतिशय अरुंद जागा आहे. दाटीवाटीनं दुकानं आहेत. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक येथून धूर येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाकडे याची माहिती दिली. त्यानंतर प्रथम काही वाहने व जवान दाखल झाले. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. आगीचे स्वरूप पाहता आणखी फायर बंब बोलवण्यात आले. आगीचा रुद्र आवतार भयावह होता.
काही वर्षांपूर्वी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन विभागाने पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागासोबत फॅशन स्ट्रीटचे फायर ऑडिट केले होते. त्यामध्ये फॅशन स्ट्रीटला आग लागण्याची भीती वर्तविण्यात आली होती. त्यामुळे बोर्डाने गाळेधारकांवर कारवाईची मोहीमही हाती घेतली होती. त्या विरोधात फॅशन स्ट्रीटमधील व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे ही कारवाई थंड बस्त्यात पडली होती. बोर्डाच्या अध्यक्षांनी काही महिन्यांपूर्वी फॅशन स्ट्रीटची पाहणी करत नव्याने फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
फॅशन स्ट्रीट बाजारपेठही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने, तेथील व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान, कँटोन्मेंट अग्निशमन केंद्राच्या गाड्या उशिराने आल्या तसेच आग नियंत्रणात आणण्यात दिरंगाई केल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे.
















