जळगाव (प्रतिनिधी) वाळू उत्खननापोटी दिलेला धनादेश न वटल्याने माजी नगरसेवक अजय राम जाधव यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच २६ लाख ९८ हजार व १० हजार रुपये असे दोन – दंड ठोठावण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथील वाळू गटातून सुनंदाई • बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे द दीपक सुधाकर पाटील यांना सन २०१६-१७मध्ये वाळू उपशाचा परवाना मिळाला होता. या वाळू गटातून पाटील यांच्यासह अजय राम जाधव यांनीही वाळू वाहतूक सुरू केली. उसनवारीने देण्यात आलेल्या वाळूच्या उत्खननापोटी जाधव यांच्याकडे असलेल्या १९ लाख ७५ हजार रुपयांपैकी त्यांनी ७५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर अजय जाधव यांनी त्यांची मे. साई एंटरप्राईज या संस्थेचा १९ लाख रुपयांचा धनादेश दीपक पाटील यांना दिला. मात्र तो धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे पाटील यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता.
दरम्यान, खटल्याची सुनावणी होऊन न्या. व्ही.एम. देशमुख यांनी जाधव यांना सहा महिने कारावास, २६ लाख ९८ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची शिक्षा तसेच १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांची शिक्षा सुनावली. दीपक पाटील यांच्यावतीने अॅड. मुकेश शिंपी, अॅड. स्वाती भोयर यांनी काम पाहिले.