जळगाव (प्रतिनिधी) राजस्थानला जाण्यासाठी निघालेल्या सोन्याचे दागिन्यांना कुंदन लावण्याचे काम करणारे कारागिर मालचंद गौरीशंकर सोनी यांच्या घरात घरफोडी केली. याठिकाणाहून चोरट्यांनी साडेचौदा तोळे सोने आणि सातशे ग्रॅम चांदीचे दागिने आणि ५० हजारांची रोकड असा एकूण १४ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना बुधवार दि. १९ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमाास गिताई नगरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गिताई नगरात मालचंद गौरीशंकर सोनी हे वास्तव्यास असून ते आणि त्यांचा भावाचा सोन्याच्या दागिन्यांना कुंदन लावण्याचा व्यवसाय आहे. दि. १५ नोव्हेंबर रोजी त्यांचे पाहुणे मयत झाले असल्याने सोनी हे दि. १८ रोजी राजस्थानी जाण्यासाठी निघाले. बुधवार दि. १९ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सोनी यांच्या शेजारी राहणारे अशोक सोनी यांनी त्यांना फोन करुन तुमच्या घरी चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार सोनी यांनी त्याच परिसरात राहणारा त्यांचा पुतण्या नरेंद्र सोनी याला घरी जावून पाहणी करण्यास सांगितले.
कपाटात ठेवलेला सोने चांदीचे दागिने नेले चोरुन
नरेंद्र सोनी यांनी काकांना फोन करुन विचारले असता, त्यांनी कपाटात ठेवलेले सोने आणि चांदीचे दागिने तपासण्यास सांगितले. सोनी यांनी दागिने आहेत की नाही हे तपासले असता, त्यांना कपाटात काहीही दिसून आले नाही. यावेळी त्यांना घरातून चोरट्यांनी सोने चांदीचा ऐवज चोरुन नेल्याची खात्री झाली.
पोलिसांची घटनास्थळी धाव
मध्यरात्रीच्या सुमारास बंद असलेल्या घरात चोरट्यांनी डल्ला मारुन ऐवज चोरुन नेल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीचे पोनि राहुल गायकवाड, सपोनि साजीद मन्सूरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले हे कर्मचाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
चोरट्यांनी चोरुन नेलेला ऐवज
चोरट्यांनी सोनी यांच्या घरातून ५५ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, १२ ग्रॅमची चैन, १० ग्रॅमचे लेडीज ब्रेसलेट, १५ ग्रॅमचे कानातील झुमके, ४ ग्रमचे कानातील जोड, ४ ग्रॅमची चैन, ७ग्रॅमची एअरिंग, २ ग्रॅमचे पेन्डल, ३३ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, ३ ग्रॅमची नाकातील फुली, ५०० ग्रॅमचे चांदीचे शिक्के, २०० ग्रॅमचे पायल जोड यासह ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण साडेचौदा तोळे सोने आणि ७०० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण १५ लाख ७० हजा रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.
















