
मुंबई (वृत्तसंस्था) कलर्स वाहिनीवर सुरू झालेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल अपमानकारक विधान केल्यावर संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानूला बिग बॉसमधून काढा, अन्यथा हा कार्यक्रम सुरू राहणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
यासंदर्भात शिवसेना आमदार आमदार प्रताप सरनाईकांनी कलर्स वाहिनीला अल्टिमेटम दिलं आहे. जान कुमार सानूनं मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल असा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडाओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. मराठी भाषेची याला चीड येते, अशा संदर्भातलं वक्तव्य जान कुमार सानूनं केलं आहे.
त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. सलमान खानने स्पर्धकांना योग्य ती समज द्यावी, असं आवाहन देखील आमदार प्रताप सरनाईकांनी केलं आहे.

















