जळगाव (प्रतिनिधी) आईच्या उपचारासाठी गेलेल्या गणेश प्रभाकर पाटील (वय २४, रा. बालाजी पेठ) यांच्या घरातून चोरट्यांनी २१ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने चोरून नेले. यावेळी त्यांची आजी घरी असतांना चोरट्यांनी सोन्याचे दागिने ठेवलेला डब्बा चोरुन नेला. ही घटना दि. २७ जून ते ४ जुलै दरम्यान बालाजीपेठेत घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बालाजीपेठेत गणेश पाटील हे वास्तव्यास असून ते सुवर्ण कर्जाचे (गोल्ड लोन) काम करतात. त्यांच्या आई आजारी असल्याने दि. २७ जून रोजी उपचारासाठी गेले होते. आईच्या उपचारानंतर दि. ४ जुलै रोजी ते घरी आले. त्या वेळी त्यांच्या आईंनी कानातील सोन्याच्या बाळ्या दागिन्यांच्या डब्यात ठेवण्यासाठी दिल्या. मात्र दागिन्यांचा डबाच चोरीला गेल्याचे त्यांना आढळून आले. पाटील हे उपचारासाठी गेलेले असताना त्यांच्या आजी घरीच होत्या.
बेडमध्ये ठेवलेला दागिन्यांचा डबा नेला चोरुन
बेडमध्ये ठेवलेला दागिन्यांचा डबा चोरट्याने चोरून नेला. त्यात कानातील सोन्याचे टोंगल, अंगठी, मंगलपोत, नथ तसेच अडीच भार वजनाचे चांदीचे जोडवे, पाच भार वजनाच्या चांदीच्या पैंजन असे एकूण ५६ हजार २५० रुपये किमतीचे दागिने होते. या प्रकरणी गणेश पाटील यांनी दि. २ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पाटील करीत आहेत.