धरणगाव (प्रतिनिधी) : शिवसेना आणि ठाकरे परिवारावरील निष्ठेचे फळ आज धरणगावच्या उद्योगपती सुरेश चौधरी यांच्या कुटुंबियांना मिळाले. राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर सुद्धा चौधरी कुटूंबियांची ठाकरे घराण्यावरील निष्ठा कायम आहे. परिणामी सुरेश चौधरी यांचे पुत्र आणि धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांची युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी आज नियुक्ती करण्यात आली.
जिल्ह्यात शिवसेना आणि सुरेश चौधरी यांचे अतूट नाते सर्वश्रुत आहे. सध्याचे पालकमंत्री यांच्या चार विजयात सुरेश चौधरी यांचा सहभाग गुलाबराव पाटील सुद्धा नाकारू शकत नाही. म्हणूनच शिवसेनेतील बंडा नंतर सुरेश चौधरी आणि निलेश चौधरी या पितापुत्रांच्या भूमिकेमुळे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, चौधरी कुटुंबीयांनी नम्रपणे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि पालकमंत्र्याच्या मतदार संघातच निष्ठावान शिवसैनिकांची मोट बांधली. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या सोबत प्रत्येक गावात संपर्क सुरु केला. परिणामी मंत्री गुलाबरावांच्या जाण्या नंतरही मतदारसंघात शिवसेनेची ताकद तसूभरही कमी झाली नाही. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या धरणगाव येथील ऐतिहासिक सभेमुळे निलेश चौधरी यांचे संघटन कौशल्य सिद्ध झाले. परिणामी निलेश चौधरी यांना बळ देण्याचे मातोश्रीवरच ठरले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दूरध्वनीवरून निलेश चौधरी यांना थेट मातोश्रीवर पाचारण केले. दोन दिवसांपूर्वीच निलेश चौधरी यांनी मातोश्री वर जाऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. याच भेटीत युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई, विस्तारक चैतन्य बनसोडे यांनी काही तरी मोठी जबाबदारी सांभाळण्याची तयारी ठेवा असे संकेत त्यांना दिले आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त जाहीर करण्यात आली. यात निलेश चौधरी यांची युवासेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड जाहीर करण्यात आली. जळगाव ग्रामीण, धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा या तालुक्यांची जबाबदारी निलेश चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
निलेश चौधरी यांनी अतिशय कमी वयात राजकारणात यश संपादन केले आहे. शिवाय, सेनेतील दोन बंडाळी त्यांनी अनुभल्या आहेत. या आधी २००५ मध्ये राज ठाकरे यांनी बंड केलं तेव्हा निलेश चौधरी यांच्या खांद्यावर भारतीय विद्यार्थी सेनेच्या तालुकाप्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली होते. या संधीच सोन करत निलेश चौधरी यांनी तेव्हा प्रथमच महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधीपदी बीव्हीएसचा झेंडा फडकविला होता. यानंतर दहा वर्ष त्यांनी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सहकाराचा अभ्यास केला आणि नंतर आपला मोर्चा उद्योगाकडे वळविला. २०२० मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवारी करून निलेश चौधरी यांनी नगराध्यक्षपद काबीज केले. नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आणि दोन महिन्यांत कोरोनाच संकट आलं. मात्र, न डगमगता निलेश चौधरी यांनी कोरोना काळात धरणगावकरांची घेतलेली काळजी कौतुकास्पद ठरली. ठाकरे कुटुंब आमचे दैवत आहे. कोणत्याही लाभासाठी नव्हे तर दैवताचे पावित्र्य जपण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे निलेश चौधरी यांनी सांगितले. कुणाशी विरोधाला विरोध आपण करणार नाही. मात्र, शिवसेनेचे संघटन मजबूत करून जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकविण्यासाठी आपण तन, मन आणि धन अर्पण करून काम करणार असल्याचा संकल्पही निलेश चौधरी यांनी बोलून दाखविला.