भंडारा (वृत्तसंस्था) घराबाहेर अंगणात झोपलेल्या तीन भावंडांपैकी एका ११ वर्षीय बालिकेला सर्पदंश झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार १९ मेच्या मध्यरात्री पालांदूर येथे घडली. वंशिका गोपीचंद देशकर असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.
राज्यभर कडक उन्हामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. सध्या कुलर लावूनही असह्य उकाडा कमी होत नसल्यामुळे अनेक परिवार घराबाहेर झोपत असतात. पालांदूर येथे शुभम, अश्विनी व वंशिका ही तीनही भावंडे शुक्रवारी रात्री नेहमी प्रमाणे जेवण करून अंगणात एकत्रित जमिनीवर झोपली होती. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या वंशिकाला सापाने चावा घेतला. काही तरी चावत असल्यामुळे झोपेत असलेल्या वंशिकाने पहिल्यांदा हात झटकला.
यामुळे चवताळून सापाने पुन्हा वंशिकाच्या हाताला घट्ट विळखा घालून जोरदार परत वाचा घेतला. यामुळे ती ओरडून जागी. वंशिकाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आई- वडीलही जागे झाले. त्यावेळी साप तिच्या गुंडाळलेला दिसल्यानंतर मात्र, सर्वांचा थरकाप उडाला. जेमतेम त्यांनी मुलीला सापाच्या विळख्यातून सोडवले आणि शेजाऱ्यांच्या मदतीने वंशिकाला पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. तिथे प्रथमोपचार केल्यावर तातडीने भंडारा येथील सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र, शरीरात विष भिनल्याने उपचारानंतर अवघ्या पंधरा मिनिटांनंतर वंशिकाचे निधन झाले. हसत्या खेळत्या मुलीचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिवार दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, अंत्ययात्रेच्या वेळी आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.