धुळे (प्रतिनिधी) शहरातील जुन्या आग्रा रोडवरील बॉम्बे लॉजजवळ असलेल्या सुवर्ण पॅलेस या सराफ दुकानाचे मागील बाजूस असलेल्या शटरची कडी तोडून तीन अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सराफ बाजार परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी दीड किलो सोने, १० किलो चांदी व १० हजार रुपयांची रोकडसह १ कोटी १० लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. घटनास्थळी श्वान पथकासह ठसेतज्ञ व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
नेमकी घटना काय !
शहरातील जुन्या आग्रा रोडवरील बॉम्बे लॉजजवळ सरदार जोरावरमल चौधरी व प्रकाश जोरावरमल चौधरी यांच्या मालकीचे सुवर्ण पॅलेस नावाचे सराफ दुकान आहे. या दुकानाची मागील बाजू ही गजानन टी समोर आहे. काल (दि. १०) रात्री २.४० ते २.५५ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरटे दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या शटर जवळ आले. त्यांनी शटरची की तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी केबिन मधील काच फोडून काउंटर जवळील ड्रावर टॉमीच्या सहाय्याने तोडून त्यात ठेवलेले ८०० ग्रॅम सोने व दुकानातील इतर ठिकाणी ठेवलेले ७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकूण १ किलो ५२० ग्रॅम सोन्याचे दागिने, १० किलो चांदी व १० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ कोटी १० लाख रुपयांचा ऐवज चोरी केला.
पोलिसांचे गस्ती वाहन आल्याने चोरटे पळाले !
चोरटे दुकानात चोरी करीत असताना आझादनगर पोलीस ठाण्याचे रात्री गस्त घालणारे शासकीय वाहनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील शेख, पोका संतोष घुगे इतर कर्मचारी हे सराफ बाजारात आले. त्यांनी एका सराफ दुकानाबाहेर बसलेल्या सुरक्षा घटना कळविली. रक्षकाची विचारपूस केली. त्यानंतर त्याची गस्ती नोंदवहीत स्वाक्षरी घेऊन पथक सायरन वाजवीत पुढे निघाले. आग्रारोडने शासकीय वाहन जात असताना गजानन टी हाऊसकडे वळले. याचवेळी चोरट्यांना पोलीस आल्याची भीती वाटली आणि ते दुकानाबाहेर पळत आले. त्यातील दोन जण दुचाकीने पसार होताना तर एक जण दुचाकीमागे पळतांना पोलिसांना दिसून आला. गस्तीवरील पोलीस तातडीने सुवर्ण पॅलेस दुकानाकडे गेले. तेव्हा दुकानाचे मागील शटर त्यांना उघडे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सुवर्ण पॅलेसचे मालक सरदारमल चौधरी यांना मोबाईलवर घटनेची माहिती दिली. यानंतर आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील व शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी गाठले.
घटनेची माहिती मिळताच दुकान मालक प्रकाश चौधरी, सरदार चौधरी व पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील तसेच शोध पथकातील कर्मचारी हे दुकानावर आले. चौधरी बंधूंनी पोलीस अधिकाऱ्यांसह दुकानात जाऊन पहाणी केली. तेंव्हा चोरी झाल्याचे आढळून आले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, श्वानपथक व ठसेतज्ञ असे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यात चोरटे रात्री २.४० वाजता दुकानात शिरले. त्यानंतर पोलिसांचे वाहन आल्यानंतर २.५५ वाजता दुकानातून बाहेर पळताना आढळून आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्या चोरटे आढळून आले असून पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.