अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील गुरुकृपा कॉलनीतील एका सहा वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्याची भयावह घटना घडली आहे. भाग्यश्री नितीन पवार (वय ६), असे जखमी बालिकेचे नाव आहे.
भाग्यश्री ही बालिका ९ रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास शेजाऱ्याला बोलवायला गेली होती. या वेळी अचानक झुंडीने मोकाट ५ कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. वेळी तिच्या हातापायांना विविध ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतला. यामुळे जिवाच्या अंकताने भाग्यश्री ओरडू लागली. पाच कुत्र्यांच्या झुंडीत तिचे लचके तोडले जात असताना तिला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.
रक्तबंभाळ झालेल्या भाग्यश्री या चिमुरडिला तातडीने कुटुंबीय आणि नागरिकांनी नर्मदा फाऊंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. डॉ. अनिल शिंदे व डॉ. संदीप जोशी यांनी भाग्यश्रीवर उपचार केले आहेत. कुत्र्यांनी तिच्या अंगावर २० ते २५ ठिकाणी चावा घेतला आहे. तिला ५० टाके पडले आहेत. दरम्यान, पालिकेकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यानिमित्ताने केली जात आहे.