कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) येथील भडगाव रोडजवळील पद्मावती जिनिंगमध्ये रुईच्या गाठी असलेल्या गोडाऊनला रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत जवळपास १ कोटी १० लाख रुपये किमतीच्या कापसाच्या रुईच्या ५०३ गाठी जळून खाक झाल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, जिनिंगच्या आवारात जिनिंग सुरू असल्यामुळे गोडावून पासून शंभर ते दीडशे फूट अंतरावर बाराशे क्विंटल कापूस व २७७ रूईच्या तयार गाठी आवारात होत्या. त्यानंतर आग लागल्याबरोबर कासोदा पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली. कासोदा पोलीस स्टेशनने फोन करून एरंडोल, भडगाव, धरणगाव व पारोळा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या ताबडतोब बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग काही प्रमाणात सुरुच होती नऊ नंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. याबाबत कासोदा पोलीस स्टेशनला किरण शांताराम पाटील यांच्या फिर्यादीवरून फिर्याद दाखल करण्यात आली.
आग आटोक्यात आणण्यासाठी कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव व त्यांचे सहकारी यांनी रात्रभर जागरण करून सहकार्य केल्याचे जिनिंगचे भागीदार वैशाली अशोक पाटील व आशिष समदानी यांनी सांगितले. यात मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच आगीचे कारण मात्र अद्यापही समजले नाही.