पुणे (वृत्तसंस्था) भारतात लोकशाही व्यवस्थेचं प्रमाणापेक्षा जास्त कौतुक असल्यामुळे आर्थिक सुधारणांमध्ये अडथळा येतो, असे मत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी नुकतेच व्यक्त केले होते. या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला आहे.
भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अमिताभ कांत हे मंगळवारी ‘स्वराज्य पत्रिका’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वार्तालापात बोलत होते. भारतात कोणत्याही सुधारणा लागू करणे खूपच अवघड आहे. भारतात जरा जास्तच लोकशाही असल्यामुळे असे घडते. केंद्र सरकारने पहिल्यांदाच खाणकाम, कोळसा, मनुष्यबळ आणि कृषी क्षेत्रातील सुधारणांना हात घातला आहे. आता त्याच्या पुढील टप्प्याची अंमलबजावणी करणे राज्यांचे काम आहे, असे अमिताभ कांत यांनी म्हटले होते. या सुधारणांमुळे देशातील १० ते १२ राज्यांचा विकासदर वाढला तर देशाचाही आपोआप विकास होईल. आम्ही केंद्रशासित प्रदेशातील सरकारी वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वीज वितरण क्षेत्रात स्पर्धा निर्माण होऊन ग्राहकांना स्वस्तात वीज उपलब्ध होईल, असेही अमिताभ कांत यांनी म्हटले.
















