वरणगाव (प्रतिनिधी) भाऊबंदकीमधील विवाहासाठी पिंपळगाव बुडुक (ता. भुसावळ) आल्यानंतर वरणगावजवळील नागेश्वर महादेव मंदिरावर दर्शनासाठी जाणाऱ्या तिघांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एसटीने धडक दिली. या अपघातात मनूर बुद्रुक (ता. बोदवड) येथील तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी २ वाजता वरणगाव जवळील सुसरी शिवारात ही दुर्घटना घडली. सचिन राजेंद्र शेळके (वय २६), जितेंद्र कैलास तावरे (वय ३३) आणि भागवत प्रल्हाद शेळके (वय ४३) तिन्ही (रा. मनुर बुद्रुक ता. बोदवड) अशी तिघं मयत तरुणांची नावे आहेत.
मनुर बुहूक येथील रहिवासी राहुल मुरलीधर शेळके यांचा सोमवारी वरणगाव जवळील पिंपळगाव येथे विवाह होता. यासाठी वऱ्हाडी जमले होते. त्यात शेळके यांच्या मनुर बुद्रुक येथील तीन तरुणही लग्नासाठी आले होते. मात्र लग्नाला दुपारी वेळ असल्याने वरणगाव येथील नागेश्वर मंदिरावर दर्शनासाठी जातो असे बऱ्हाडींमधील सचिन राजेंद्र शेळके (वय २६) याने आपले काका विजय शेळके यांना सांगितले.
यानंतर नातेवाइक असलेले भागवत प्रल्हाद शेळके (वय ४३) आणि जितेंद्र कैलास चावरे (वय ३२) यांच्यासह तो दुचाकीने (क्र. एमएच. १९- सीएस.१ १९८) वरणगावकडे निघाला. मात्र, दुपारी २ वाजेच्या सुमारास वरणगावकडे येताना सुसरी शिवारात समोरून येणाऱ्या भुसावळ- देवळसगाव (क्र. एमएच.२०- बीएल.०९. ४८) धडक दिली. त्यात दुचाकीवरील सचिन शेळके, भागवत शेळके व जितेंद्र चावरे (तिथे रा.मनुर बुडूक) हे जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. दरम्यान, सनई वाजण्याच्या वेळीच तिन्ही मित्रांना एकाचवेळी एकाच अंत्ययात्रेत शेवटचा निरोप देण्यात आला.
यातील सचिन शेळके याच्या पश्चात आई वडील, पत्नी तीन वर्षाचा मुलगा आहे. भागवत शेळके यांना मुलगा व मुलगी आहे तर जितेंद्र चावरे याच्यावर वृद्ध आई- वडिलांची जबाबदारी होती. घरातील तीन कर्ते अपघातात गेल्यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विजय जगनाथ शेळके (रा. मनूर) यांच्या फिर्यादीवरून बसचालक दीपक अप्पा तायडे (वय ५३) यांच्याविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालय गाठले. मृतांच्या नातेवाईकांचे सात्वंन केले. दरम्यान या घटनेनंतर लग्नस्थळी देखील दुखाचे सावट पसरले. मृताच्य कुटुंबीयांना ही घटना कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. मृत तिथे घरातील कर्ते होते. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी देखील हळहळ व्यक्त केली.