मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील मुंब्रा परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या सात वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केली आहे. विकृत आरोपीनं पत्नीसोबत झालेल्या वादाचा राग चिमुकलीवर काढला आहे. माहिरा अनिस खान असं हत्या झालेल्या 7 वर्षीय चिमुकलीचं नाव आहेत. तर अनिस मालदार खान असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वडिलांचं नाव आहे.
आरोपी अनिस हा मुंब्रा येथील संतोषनगर परिसरात पत्नी आणि मृत मुलगी माहिरासोबत वास्तव्याला होता. शुक्रवारी रात्री सोनोग्राफी करण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणातून आरोपी अनिसचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता. हा वाद वाढत गेल्याने पत्नी आपल्या 7 वर्षीय मुलीला घेऊन शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी गेली. पण आरोपी दोघींचा पाठलाग करत नातेवाईकांच्या घरी पोहोचला.
नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर देखील पती पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर अनिसने आपली सात वर्षीय मुलगी माहिरा हिला पळवून दत्तुवाडी येथील निर्जनस्थळी नेलं. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं आपल्या पत्नीच्या मोबाईलवर फोन केला आणि ‘माहिराचा शेवटचा आवाज ऐकून घे’ असं सांगितलं. आणि शनिवारी पहाटे अनिसने आपला फोन पुन्हा सुरू केला आणि माहिराची हत्या केल्याची माहिती पत्नीला दिली. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी वडील अनिसला ताब्यात घेतलं. पण अनिस याने आधीच विष प्राशन केलं होतं. त्यामुळे पोलिसांनी तातडीने अनिसला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आरोपीची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
















