अमरावती (वृत्तसंस्था) अंघोळ करीत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बाथरूमच्या छिद्रातून ‘आय लव यू’ असे नमूद असलेली चिठ्ठी फेकण्यात आली. सोबतच कागदाच्या गुंडाळीत एक क्रिम पाऊच देखील टाकण्यात आले. ही धक्कादायक घटना गुरुवार, १३ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सरमसपुरा ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं !
रवींद्र (३५) रा. अचलपूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी ही गुरुवारी सकाळी बाथरूममध्ये अंघोळ करीत होती. अचानक कोणीतरी बाथरूमच्या भिंतीला असलेल्या छिद्रामधून एक कागदाची गुंडाळी आत टाकली. पिडीतेने गुंडाळी उचलून बघितल्यावर त्यामध्ये एक चिठ्ठी होती. त्यात हिरव्या शाईने ‘आय लव्ह यू यार’ असे मराठी व इंग्रजीमध्ये लिहिलेले होते. तर खाली इंग्रजीमध्ये रवी अशी सही केलेली होती. चिठ्ठीसोबत क्रिमचे एक पाऊच सुद्धा होते. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली. त्याचवेळी तिला बाथरूमच्या चौकटीसमोर रवींद्र दिसला. तो वॉल कम्पाउंडच्या भितीवरून उडी मारून पळून गेला. त्यानंतर तिने चिठ्ठी व क्रिम वडिलांना दाखवून घडलेली घटना सांगितली.
रवींद्रने मागितली माफी !
त्यावर तिच्या वडिलांनी रवींद्रला याचा जाब विचारला. त्यावेळी माझी चूक झाली, मला माफ करा, अशी विनवणी त्याने केली. त्यानंतर वडिलांनी पीडित मुलीसोबत पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी रवींद्रविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.