छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) घरगुती भांडणातील दाखल गुन्ह्यांत मदत करणे, वाढीव कलमा न टाकणे, अटक न करण्यासाठी सहकार्य करावे यासाठी तक्रारदाराकडून पाच हजारांची रक्कम स्वीकारणाऱ्या देवगांव रंगारी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.३१) रंगेहाथ पकडले. पो.हे.कॉ सुरेश देवराव शिंदे, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी देवगांव रंगारी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. देवगाव रंगारी पोलीस ठाणे हद्दीतील जेऊर, औराळा भागात तक्रारदार यांचे मोठे भाऊ, भावजयीसोबत घरगुती भांडणे झाली होते. याप्रकरणी येथील ठाण्यात तक्रारदार विरोधात कलम ३२४, ३२३, ५०६, ४२७ भादवी अंतर्गत नोंद करण्यात आली होती. या प्रकरणात तक्रारदारास गुन्ह्यात मदत करणे, वाढीव कलमा न टाकणे, अटक न करणे या कामासाठी पंचवीस हजार लाचेची मागणी पो.हे.कॉ सुरेश देवराव शिंदे केली होती.
तडजोडीअंती पाच हजार देण्याचे ठरले. मात्र ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
विभागाने सापळा लावल्यानंतर पाच हजारांची रोख रक्कम स्वीकारताना शिंदे यास ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सापळा अधिकारी सचिन साळुंखे, सहाय्यक सापळा अधिकारी हनुमंत वारे, विशाल खांबे, राजीव तळेकर, पो.ना. दिगबंर पाठक, पो. अधिकारी केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल आदींनी केली.