नागपूर (वृत्तसंस्था) स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत नागपूरवरून कोंढाळीच्या दिशेने जाणाऱ्या जलालखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याच्या कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शांताराम गोविंद चन्ने (४८, शनिवारपेठ कोंढाळी), असे मृतकाचे नाव आहे.
कोंढाळी येथील संत्रा व्यापारी रवींद्र ठवळे, विनोद पोकळे व शांताराम चन्ने हे तिघे (एमएच ४० / डब्ल्यू ०७५५) क्रमाकांच्या दुचाकीने संत्रा बगिचाची पाहणी करून नागपूर-कोंढाळी मार्गाने कोंढाळीच्या दिशेने जात होते. नागपूर ते कोंढाळी महामार्गावरील कोंढाळीपासून एक किमीवरील दुधाळा शिवारात पुष्पांजली हॉटेलसमोर नागपूरकडून भरधाव येणाऱ्या (एमएच २७/ बीझेड ५२०१) या कारने दुचाकीला धडक दिली. जलालखेडा ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी हे कार चालवित होते. हा अपघात इतका भयावह होता की, दुचाकीस्वार रवींद्र ठवळे व विनोद पोकळे, शांताराम चन्ने दुचाकीसह महामार्गाच्या बाजूला गवतात फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. कारचालक ठाणेदार मनोज चौधरी यांनी तातडीने मदत करून तिघांनाही कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
याठिकाणी प्राथमिक उपचार करून तिघांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. मेयोत उपचारादरम्यान शांताराम गोविंद चन्ने यांचा मृत्यू झाला. कोंढाळी पोलिसांनी कारचालक साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज चौधरीविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे. कोंढाळी येथे संत्रा व भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या शांताराम चन्ने यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असे कुटुंब आहे. मृतक शांताराम हे घरात एकटेच कमावते होते. त्यांच्या कुटुंबीयांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता. मृतकांच्या कुटुंबीयांनी कोंढाळी पोलीस ठाण्यात येऊन या अपघाताला जबाबदार साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी यांना अटक करण्याची मागणी केली आहे.