जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ रोडवरील स्वामी नारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ठिकाणी कर्तव्यावर हजर असलेले रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गौतम सांडू केदार (वय ५६, रा. पोलीस लाईन) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना रविवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
केदार यांची वर्षभरापुर्वी उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती. पदोन्नती झाल्यानंतर त्यांना रामानंद नगर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली होती. तीन दिवसांपासून भुसावळ रोडवरील स्वामी नारायण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. याठिकाणी केदार हे बंदोबस्तासाठी तैनात होते. कर्तव्यावर हजर असतांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना रविवारी दुपारच्या सुमारास उपनिरीक्षक केदार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.