यवतमाळ (वृत्तसंस्था) दुर्गादेवी विसर्जनाचीं मिरवणूक पाहून परतणाऱ्या युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आर्णी येथील भाजी मार्केट परिसरात सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. अजय अवधुत तिगलवार (वय २३ रा. कोळवण, ता. आर्णी) असे मृताचे तर दत्ता शंकर वानखडे (३०) रा हैदरी बंगला, आर्णी, ओम गजानन बुटले (२५) रा. जुना आठवडी बाजार, आणी अशी मारेकऱ्यांची नावे आहेत.
याबाबत जतीन दीपक पट्टवार यांनी आणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जतीन व अजय दुर्गादिवीची मिरवणूक पाहून परत जात होते. यावेळी दोन्ही मारेकऱ्यांनी त्यांची दुचाकी अडवून खाली पाडले. त्यानंतर दत्ताने चाकूने अजयच्या पोटावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर जतीन गंभीर अवस्थेतील अजयला आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी डॉक्टरांनी तपासणीअंती अजयला मृत घोषित केले. अजयचा खून झाल्याची माहिती मिळताच कोळवण येथील ग्रामस्थांनी धाव घेतली. यामुळे रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयासमोर दुर्तफा रस्ता अडविल्याने वाहतूक ठप्प झाली होती. परंतू पोलिसांनी सहकार्य करा, अशी समजूत घातली. त्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली. एसडीपीओ आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार केशव ठाकरे यांनी तीन पथके गठित करून आरोपींचा शोध सुरू केला. दत्ता वानखडे हा भानसरा जंगला लपून असताना त्याला ताब्यात घेण्यात आले तर ओम बुटलेला पुलगावातून अटक करण्यात आली. आरोपींनी मृतक अजयवर चाकूने वार करून मारल्याची कबुली दिली.
मृतकाचे शवविच्छेदनादरम्यान पीएसआय गजानन अजमिरे, योगेश संकुलवार, मनोज चव्हाण, अतुल पवार, अजय ठाकरे, विशाल गावडे यांनी बंदोबस्त ठेवला होता. अटकेची कारवाई ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय बनारे, पीएसआय चंदन वानखडे, सतीश चौधार, गणेश राठोड, अशोक टेकाळे, अरविंद चेमटे, सचिन पिसे, मिथुन जाधव, बबलू चव्हाण, अमित झेंडेकर, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव यांनी केली.
दरम्यान, अजयचा खून नेमका कुठल्या कारणातून झाला हे अजूनही उलगडलेले नाही, सोबत असलेला मित्र जतीन याला सुद्धा या अचानक हल्ल्यामुळे धक्का बसला. आरोपींचा अजयसोबत नेमका कोणता वाद होता?, ज्यावरून त्याचा थेट खून करण्यात आला?, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातून समोर येणार आहेत.