जळगाव (प्रतिनिधी) दिव्यांग आणि अपंग बांधवांना दुचाकी, तीन चाकी व विशिष्ट प्रकारचे बदल केलेल्या वाहनांसाठी लायसन्स मिळावे यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे विशिष्ट दिवस राखीव ठेवण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडे केली आहे.
दिव्यांग बांधवांना कायदेशीर वाहन परवाना (लायसन्स) मिळण्याचा अधिकार आहे. मात्र, यासाठी त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिव्यांगांना अनेक वेळा जिल्हा रुग्णालयाचे चकरा माराव्या लागतात. या त्रासातून त्यांची सुटका होण्यासाठी, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा थेट जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित राहावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
वैद्यकीय पथकाची उपलब्धता आवश्यक
परिवहन कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी एक विशिष्ट दिवस राखीव ठेवण्याची व्यवस्था केल्यास त्यांच्या वाहन परवाना प्रक्रियेस चालना मिळेल. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक त्या दिवशी थेट परिवहन कार्यालयात उपस्थित राहून तपासणी करून संबंधितांना आवश्यक प्रमाणपत्र देऊ शकते. यामुळे दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींवर मात करता येईल आणि वेळेची बचत होईल.
दिव्यांगांचे हक्क आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न..
ॲड जमील देशपांडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, दिव्यांग आणि अपंग बांधवांनाही समाजात सन्मानाने जगण्याचा आणि विविध सुविधा मिळवण्याचा हक्क आहे. वाहन चालविण्याचा परवाना मिळाल्यास त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, तसेच त्यांच्या जीवनात आनंद व स्वावलंबन येईल. या मागणीसाठी परिवहन आयुक्तांनी योग्य परिपत्रक काढून तातडीने अंमलबजावणी करावी, असे ॲड देशपांडे यांनी सुचविले आहे.