नंदुरबार (वृत्तसंस्था) धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील बर्डीपाडा फाट्याजवळील टोलनाक्याच्या बांधकामाच्या ठिकाणी गुरुवारी पहाटे भरधाव कार कठड्याला धडकून झालेल्या अपघातात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. इतर आठ जणदेखील जखमी झाले आहेत. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा फाट्याजवळ टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. वत्सला गोवर्धन सोनवणे (७०) असे मृत महिलेचे नाव आहे.
राष्ट्रीय क्रमांक सहावर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून बर्डीपाडा फाट्यानजीक टोलनाक्याचे बांधकाम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी कोणतेही सूचना व दिशादर्शक फलक नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. गुरुवारी पहाटेदेखील अपघात झाला. भरधाव कार दुभाजकाला धडकली. स्थानिक गावकरी व विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील हवालदार लिनेश पाडवी, अतुल पानपाटील व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नवापूर रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमींमध्ये हरीश मनोहर भालेराव, राहुल यशवंत नगराळे, सावित्री राहुल नगराळे, सरिता दीपक सोनवणे, प्रिया राजेंद्र सोनवणे, मानसी राजेंद्र सोनवणे, मनोज आधार सपकाळे, दक्ष राहुल नगराळे (सर्व रा. अल्का पार्क, वसरापूर स्टेशन रोड अहमदाबाद) यांचा समावेश आहे. याबाबत हरीश भालेराव यांनी विसरवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास हवालदार अरुण कोकणी करत आहेत.