चोपडा (प्रतिनिधी) जैनधर्मीय गुरू आचार्य कामकुमारनंदजी महाराज यांची हिरगुडी आश्रम (ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) येथे अमानुष हत्या झाली. या घटेनचा चोपडा सकल जैन समाजाने निषेध व्यक्त करत प्रशासनाला निवेदन दिले.
आम्ही अहिंसामार्गी जैन धर्मीय आहोत. जैन धर्मीय गुरु, साधू व आचार्य यांचे जीवन नि:स्वार्थी, निष्कलंक आणि अहिंसावादी राहते. असे असतानाही पाच जुलैला जैन धर्मीय आचार्य कामकुमारनंदजी महाराज यांची हिरगुडी आश्रम येथे अमानुष हत्या झाली. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. हत्येचे कृत्य दहशतवादापेक्षाही भयंकर स्वरूपाचे असल्याच्या भावना समाज बांधवांनी व्यक्त करत चोपडा तहसीलदार यांना निवेदन दिले.
तसेच मुनीश्रींचा हत्येचा कट ज्यांनी रचला त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ही चोपडा सकल जैन समाजाने केली आहे. यावेळी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदीर संस्थान चोपडा,श्री 1008 चंद्रप्रभु महाराज दिगंबर जैन मंदीर संस्थान चोपडा, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रीसंघ चोपडा, तारण तरण जैन समाज चोपडा आदी समाज बांधव देखील उपस्थित होते.
















