जळगाव (प्रतिनिधी) जळगावात एका विद्यार्थ्याने चक्क एक रोबोट विकसित केलाय, जो बियाण्यांची लागवड, पिकांना खते देणे, औषध फवारणी करणे एवढेच नव्हे तर पिकांना स्वयंचलित पद्धतीने पाणी देणे, अशी शेतीची सगळी काम हा रोबोट करू शकतो. सोहेल हमीद कच्छी असे रोबोट तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने ‘ॲग्रोबॉट’ नावाचा एक रोबोट विकसित केला आहे.
सोहेल हमीद कच्छी असे रोबोट तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रहिवासी आहे. भुसावळातील श्री संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो संगणक शाखेत तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. सोहेल कच्छी हा संगणक शाखेचा विद्यार्थी आहे. सॅनिटायझरचे महत्त्व लक्षात घेऊन यापूर्वी त्याने ‘ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेन्सिंग मशीन’ बनवले आहे. कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी याच मशिनच्या धर्तीवर काहीतरी भन्नाट उपकरण विकसित करावे, हा विचार त्याच्या मनात आला. शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार केल्यावर रोबोटची कल्पना त्याला सुचली. ही कल्पना त्याने प्रत्यक्षात उतरवत शेतीची सर्व कामे करणारा ‘ॲग्रोबॉट’ नावाचा एक रोबोट विकसित केला. वसई येथील विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट शोकेस कॉम्पिटिशन नुकतीच घेण्यात आली होती. तसेच या स्पर्धेत देशभरातील ३०० संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सोहेलने बनवलेल्या रोबोटने कृषी गटातून पहिला क्रमांक पटकावला.
अत्यंत कमी खर्चात बनवला ‘ॲग्रोबॉट’ रोबोट
सोहेलने ॲग्रोबॉट हा रोबोट अत्यंत कमी खर्चात बनवला आहे. यासाठी त्याने पीव्हीसी पाइपचे तुकडे, खेळण्यातील चाके, ड्राइव्ह मोटारी यासह इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल पार्टस तसेच उपकरणांचा वापर केला आहे. हा रोबोट बियाण्यांची लागवड करणे, पिकांना खते देणे, औषध फवारणी करणे, पिकांना स्वयंचलित पद्धतीने पाणी देणे अशी कामे तर करेलच, याशिवाय परिसराचे तापमान, आर्द्रता, हवेचा वेग अशा स्वरुपाची माहितीही शेतकऱ्यांना देईल. हा रोबोट एक प्रायमरी मॉडेल म्हणून विकसित केला आहे. भविष्यात या मॉडेलच्या माध्यमातून शेती उपयोगी यंत्र साकारता येऊ शकते.