जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघातील चोरी आणि अपहार प्रकरणी दाखल गुन्हाच्या चौकशीला पोलिस प्रशासनाकडून सुरुवात झाली असून, शुक्रवारी जिल्हा दूध संघात तब्बल सात तास ठाण मांडून सर्व विभागातील फाईलींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पोलिसांनी जिल्हा दूध संघातील गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड जप्त केला.
गेल्याच आठवड्यात आमदार मंगेश चव्हाण आणि दुध संघाचे एमडी मनोज लिमये यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फिर्याद देत दुध संघातील चोरी आणि अपहार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार दूध संघातील चोरी आणि अपहार प्रकरणाच्या चौकशीला पोलिसांनी सुरुवात केली आहे. बुधवारी पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्याकडे दोन्ही गुन्ह्यांचे तपास सोपवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी चिंथा यांच्यासह पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सहायक निरीक्षक संदीप परदेशी हे पथकासह दूध संघात गेले होते. त्यांनी विविध विभागांकडून माहिती, कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यानंतर शुक्रावारी पुन्हा एकदा पथक दुध संघात गेले होते.
२०१६ ते २०२० पर्यंतच्या फाईलींची तपासणी
शुक्रवारी पोलीस दुध संघात आल्यांनतर त्यांना फाईलींची तपासणी करू देण्यास विरोध दर्शविण्यात आला. मात्र, चौकशीबाबतचे काही कागदपत्र दाखविल्यानंतर पोलिसांनी सर्व विभागातील फाईलींची तपासणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला २०१७ मधील संचालक मंडळाने घेतलेले ठराव, दूध संघाचा वार्षिक अहवालाची तपासणी केली. तसेच टप्याटप्प्याने २०१६ ते २०२० पर्यंतच्या फाईलींची तपासणी करण्यात आली.
सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे फोन केले स्विच ऑफ
पोलिसांचे पथक संघात पोहचल्यानंतर ज्या विभागात तपासणी करण्यात आली. त्या विभागातील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले. तर काहींचे फोन स्वीच ऑफ करण्याबाबतच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या. पोलिसांकडून तब्बल सात ते आठ तास फाईली कसून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही बाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.