छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) पैठणगेट परिसरातील शारदाश्रम उच्चभ्रू वसाहतीत ७२ वर्षीय वृद्धेचा तिच्याच भाडेकरूने हातपाय बांधून गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली. अलका गोपालकृष्ण तळणीकर असे मयत महिलेचे नाव आहे. अलका गोपालकृष्ण तळणीकर (वय ७२), असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर अशोक गणेश वैष्णव (३२, मूळ रा. डोणगाव) यानेच ही हत्या केल्याची गुरुवारी पहाटे कबुली दिली आहे.
पैठणगेट परिसरातील शारदाश्रम कॉलनीत अलका तळणीकर यांची ‘श्री निवास’ नावाची बिल्डिंग आहे. त्यांच्या सोबत बहिणीचा मुलगा अजिंक्य राहत होता. मागील ३०-३५ वर्षापासून त्या पतीपासून विभक्त राहत असून पती राजेश परदेशी व मुलगा अमित परदेशी हे शिराढोण (ता. कळंब, जि. धाराशिव) येथे राहतात.
अलका तळणीकर या इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत. होत्या. तर वरच्या मजल्यावरील काही खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या होत्या. त्यामध्ये विद्यार्थी तसेच खासगी काम करणारे भाडेकरू तर खालच्या मजल्यावर मेस व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी राहतात. अशोक वैष्णव हाही गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याकडे भाड्याने राहत आहे. तो अविवाहित असून खासगी ड्रायव्हर म्हणून काम करतो.
अशोक वैष्णव याने बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास इमारतीच्या खाली माऊली मेस चालवणारे भाडेकरू शंकर तिवारी यांच्याजवळ आला व माझ्यासोबत चला, खून झाला आहे असे सांगून त्यांना वर घेऊन गेला. त्यानंतर तिवारींनी अलका तळणीकर यांचे नातेवाईक विशाल पांडे यांना फोन करून तसेच क्रांतीचौक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला.
अलका यांनी भडकल गेट परिसरातील कौटुंबिक संपत्ती विकल्याने त्यांना कोटी रुपये मिळाले होते. भाडेकरू अशोकला हे माहीत होते. ते पैसे कपाटातच असतील, असे त्याला वाटले. मित्रच असल्याने अलका यांच्या बहिणीचा मुलगा अजिंक्यनेदेखील त्याला काही दिवसांपूर्वी दीड दोन लाख रोख मोजण्यासाठी सांगितले होते, तेव्हा त्याचे डोळे फिरले. अजिक्य बाहेरगावी जाताच अशोकने चोरी करण्याचा डाव साधला. अलका जेवण करून झोपल्या तेव्हा त्याने प्रवेश करत कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अलका यांना चाहूल लागली व त्यांनी विरोध सुरु केला. त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. ही माहिती त्या सर्वांना सांगतील म्हणून वैष्णवने उशीने त्यांचे तोंड दाबून खून केला. नंतर खुर्चीवर बसवून त्यांचे हात चिकटपट्टीने पाठीमागे बांधले होते तर पाय शॉलने बांधले.
बहिणीचा मुलगा अजिंक्य याने रात्री अलका मावशी जेवण केले का? हे विचारण्यासाठी अजिंक्यने मावशीला फोन लावला. मात्र, मावशीने फोन उचलला नाही, त्यामुळे अजिंक्यने भाडेकरू मेस चालक शंकर तिवारी यांना फोन लावून मावशी फोन उचलत नाही, बघून या म्हणून सांगितले. शंकर तिवारी यांनी काम करणाऱ्या मुलाला वरच्या मजल्यावर मावशीकडे पाठवले. त्यावेळी मावशी घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्याने तातडीने शंकर तिवारी यांना सांगितले. शंकर तिवारी यांनी अजिंक्य व पोलिसांना घटनेची माहिती दिली तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला.
अलका यांच्या इमारतीचे गाळे भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. मात्र, चार दिवसांपूर्वी घराचे सीसीटीव्ही कॅमेरे आश्चर्यकारकरीत्या बंद झाल्याचेही समोर आले आहे. तर ‘मला पैसे चोरायचे होते. पण तेव्हाच अलका तळणीकर ह्या उठल्या व आरडाओरड सुरू केल्याने गळा, तोंड दाबून मारून टाकले असे अशोकने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत काही संशयितांचे तांत्रिक तपासासाठी मोबाईल जप्त केले. अशोकला गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली, तर आणखी एका संशयिताची दिवसभर पोलिसांनी कसून चौकशी केली. सायंकाळी त्याला सोडून देण्यात आले. मात्र, त्याचा मोबाईल जप्त करत शहर न सोडण्याची ताकीद त्याला देण्यात आली आहे.