बीड (वृत्तसंस्था) रिल्स बनविण्याच्या नादात दुचाकी चालविणाऱ्याचे लक्ष विचलित होऊन दुचाकी बायपासवर असलेल्या कठड्यावर धडकल्याने पाठीमागे बसलेला जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बीड बायपासवर घडली. हे दोन्ही मित्र जालना येथील रहिवाशी आहेत. अनिरुद्ध कळकुंबे (२५) असे मयताचे नाव आहे. तर मधू शेळके (३०, दोघेही रा. गणेशपूर, जालना) हा जखमी आहे.
अनिरुद्ध कळकुंबे आणि मधू शेळके दोघेही शुक्रवारी सकाळीच दुचाकीवरून (एमएच २१ एम ११५४) बीडमार्गे तुळजापूरला जात होते. मधू दुचाकी चालवत होता तर अनिरुद्ध त्याच्यामागे बसलेला होता. बीड बायपासवर आल्यावर दुचाकीवर असतानाच अनिरुद्ध आपल्या मोबाइलवर रिल्स बनवण्यासाठी व्हिडिओ तयार करू लागला. यावेळी दुचाकीस्वार मधूचे लक्ष विचलित झाले आणि दुचाकी बाजूच्या कठड्यावर आदळली. यामध्ये डोक्याला व छातीला मार लागल्याने अनिरुद्धचा जागीच मृत्यू झाला तर कठडा व दूरपर्यंत फरपटत गेल्याने मधूच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून, तो सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे. या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.